न्या.सावंत हे असे व्यक्ती होते ज्यांनी टाइम्स नाऊ सारख्या माध्यमाला गुडघे टेकायला लावले होते

१० सप्टेंबर २००८. संध्याकाळी ६.३० वाजताची वेळ. टीव्ही वर नेहमीच्या न्यूज बुलेटिन सुरु होत्या. टाइम्स नाऊ या चॅनेलने प्रॉव्हिडन्ट घोटाळ्याची बातमी प्रसारित केली होती. या घोटाळ्यात एका न्यायाधीशाचे नाव आले असल्याचं सांगत त्यांनी एक फोटो टीव्ही वर दाखवला. ते सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती जस्टीस पी बी सावंत होते.

पी.बी. सावंत यांचे सेक्रेटरी हा शो पाहात होते. त्यांनी लगेच सावंत यांना फोन लावला आणि काय घडलंय ते सांगितलं. खरं तर प्रॉव्हिडंट घोटाळ्याशी सावंत  कोणताही संबंध नव्हता तर जस्टीस पी.के सामंता यांच्यावर या घोटाळ्यात सहभागी असण्याचे आरोप केले गेले होते.

टाईम्स नाऊ चॅनेलने नामसाधर्म्यामुळे चुकून सामंता यांच्या ऐवजी पी.बी.सावंत यांचा फोटो प्रसारित केला होता.

रागावलेल्या जस्टीस सावंत यांनी टाईम्स नाऊ चॅनेलला त्यांची चूक निदर्शनास आणून दिली व या बद्दल माफी मागायला सांगितलं. पण या चॅनेलने माफी मागण्याचे कष्ट घेतले नाहीत.अखेर १५ सप्टेंबर रोजी पी.बी.सावंत यांनी टाईम्स नाऊला मानहानी केल्याबद्दल नोटीस पाठवली आणि माफी न मागितल्यास १०० कोटींचा दावा करणार असल्याचे सांगितले.

२५ सप्टेंबरला टाईम्स नाऊकडून उत्तर आले की आम्ही गेले दोन दिवस आपली माफी मागितल्याचा स्क्रोल आमच्या चॅनेलवर दाखवला जात आहे व तो पाच दिवस चालणार आहे. पण जस्टीस सावंत यांनी त्यांना खडसावलं की तुम्ही लीगल नोटीस पाठवल्यानंतर मग माफी मागितली. हे योग्य नाही.

साधारण १ ऑक्टोबरच्या दरम्यान टाइम्स नाऊचे तत्कालीन चीफ एडिटर अर्णब गोस्वामी यांनी जस्टीस सावंत यांना भेटण्यासाठीची अपॉइंटमेंट मागितली. सावंत यांनी त्यांना ११ तारखेला सायंकाळी ४ वाजता आपल्या पुण्याच्या घरी भेटण्यास बोलावलं. पण अर्णब गोस्वामींचा रिप्लाय आला की त्या दिवशी माझं ऑपरेशन असल्यामुळे मला पुण्याला येणे जमणार नाही.

ऑपरेशनचे कारण सांगणारे अर्णब गोस्वामी त्या दिवशी आपल्या चॅनेलवर न्यूज शोजचं ऍकरिंग करताना दिसले. आता मात्र जस्टीस सावंत यांच्या लक्षात आलं कि जोवर मीडियाला धडा शिकवला जात नाही तोवर हे अशा घटनांना सिरीयस घेतले जाणार नाही.

त्याच दिवशी पी.बी.सावंत यांनी पुणे कोर्टात जाऊन टाईम्स नाऊ चॅनेलविरुद्ध १०० कोटींचा मानहानीचा दावा ठोकला.

जस्टीस सावंत यांनी हि केस दाखल केल्यावर संपूर्ण देशभरात चर्चा सुरु झाली. अनेकांनी सध्याच्या मीडियावर बेफिकीरीने न्यूज चालवल्याबद्दल टीका केली. पण काही जणांचं म्हणणं होतं की टाइम्स नाऊने फक्त १५ सेकंदासाठी चुकीचा फोटो वापरला आणि पुढे त्याबद्दल माफी देखील मागितली होती. न्यूज चॅनेलची चूक आहे मात्र न्यायमूर्ती सावंत यांनी टोकाचं पाऊल उचललं असल्याची भावना व्यक्त केली.

पण फोटो चुकीचा वापरला हि चूक चॅनेलने केलीच पण सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायाधीशाने दोन वेळा नोटीस पाठवूनही त्यांनी माफी मागितली नाही आणि नंतर तर त्यांचे संपादक अर्णब गोस्वामी आपल्या शस्त्रक्रियेबद्दल खोट बोलले याचा जस्टीस सावंत यांना मुख्य राग आला.

फक्त एकाच चॅनेलला नाही तर या प्रकरणातून संपूर्ण मीडियाला यातून धडा शिकवण्यासाठी ते सरसावले.

जर एखादा उद्योगपती आपल्याच भावाविरुद्ध १० हजार कोटींचा दावा ठोकू शकतो तर एक प्रामाणिक  न्यायाधीश आपल्या मानहाणीवर १०० कोटींचा दावा ठोकत असेल तर चूक काय असं त्यांचं म्हणणं होतं. ही केस जिंकल्यास १०० कोटी रुपये चॅरिटीला दान देण्याची देखील त्यांनी घोषणा केली.

पुणे कोर्टात न्यायमूर्ती व्ही.के.देशमुख यांच्या समोर हि केस उभी राहिली. त्यांनी दोन्ही बाजू ऐकून घेतल्या. जवळपास तीन वर्षे हि केस चालली. टाइम्स नाऊ कडून तीन साक्षिदारानी जबाब दिला तर सावंत यांच्या कडून दोन साक्षीदारांनी जबाब दिला.

टाईम्स नाऊने न्यायालयातही आपली चूक झाल्याचे मान्य केले होते. मात्र अर्णब गोस्वामी यांचं म्हणणं होतं की हि चूक नसून हा कॉम्प्युटरमुळे झालेला एरर होता.

पुणे न्यायालयाने मात्र त्यांचं म्हणणं धुडकावून लावत जस्टीस पी.बी.सावंत यांच्या बाजूने निकाल दिला. चॅनेलला १०० कोटी रुपये मानहानीचे भरण्यास सांगितले.

हा निकाल आल्यावर मात्र संपूर्ण मीडिया जगतात खळबळ उडाली. हा न्यूज माध्यमांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला असल्याचं बोललं गेलं. विरोधी पक्ष नेते अरुण जेटली यांनी देखील या निकालावर असंतोष व्यक्त केला. एकेकाळी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे चेअरमन राहिलेल्या सावंत यांनी तरी हा दावा करायला नको हवा होता असं बोललं गेलं.

टाईम्स नाऊ चॅनेल आणि अर्णब गोस्वामी या निकालाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाकडे गेले. मात्र तिथेही चॅनेलची अपील दाखल करण्याआधी मानहानीचा रकमेपैकी २० कोटी रुपये कोर्टात डिपॉजिट म्हणून जमा करण्याचे आदेश दिले. टाइम्स नाऊ व अर्णब गोस्वामी यांच्या साठी हा मोठा धक्का मानला गेला.

या विरुद्ध सुप्रीम कोर्टातूनही त्यांना दिलासा मिळाला नाही. सुप्रसिद्ध वकील हरीश साळवे यांनी त्यांची बाजू मंडळी मात्र तरीही सर्वोच्च न्यायालयाचे जस्टीस संघवी आणि जस्टीस मुखोपाध्याय यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयात दखल देण्यास नकार दिला.

स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच एका निवृत्त न्यायाधीशाने मीडियाला धडा शिकवला होता.

आजकालचा बातम्या सांगतानाचा कॅज्युअल अप्रोच हा कसा वाढत आहे आणि आपलंच म्हणणं खरं हे सांगण्याचा दुराभिमान चुका जर झाल्या तर माफी न मागता जबाबदारी झटकली जाते हे या १०० कोटींच्या मानहानीच्या केसमुळे सिद्ध झालं होतं.

पी.बी.सावंत जवळपास ६ वर्षे सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश राहिले. सामाजिक, आर्थिक प्रश्नावर त्यांनी जे निर्णय दिले त्यावर संसदेत कायदे करावे लागले. निवृत्तीनंतर सामाजिक चळवळीमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. निवडणुकांमधील वाढता भ्रष्टाचार याच्या विरुद्ध त्यांनी आवाज उठवला होता व काही काळ अण्णा हजारे यांच्या सोबत काम केलं होतं. 

पुण्याच्या पहिल्या एल्गार परिषदेचे ते अध्यक्ष होते तसंच मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी नेमण्यात आलेल्या समन्वय समितीचेदेखील ते काही काळात अध्यक्ष होते. इतकी वर्षे सामाजिक जीवनात कार्यरत असूनही कधी टीका किंवा आरोप झाले नाहीत.

आपल्या आदर्शवादी वागण्याने देशभरात गाजलेल्या माजी न्यायमूर्ती पी.बी.सावंत यांचं आज वृद्धापकाळाने निधन झालं. ते ९१ वर्षांचे होते.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.